Babanrao Dhakane Passed Away | माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) यांचं निधन झालं आहे. ते निमोनियाने ग्रासले होते त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. तर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बबनराव ढाकणे यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.
बबनराव ढाकणे यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर आज दुपारी ढाकणे यांचं पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसंच शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
10 नोव्हेंबर 1937 रोजी बबनराव ढाकणे यांचा जन्म अकोल्यामध्ये झाला. तसंच ते बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे लोकसभेवर निवडून आले होते. ढाकणे हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. त्यासोबतच त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामामध्ये देखील सहभाग घेतला होता.