Babar Azam On Pakistan Team : भारताविरूद्धचा सामना हरल्यापासून पाकिस्तान संघासाठी कोणताही गोष्ट व्यवस्थित होत नाहीये. त्यांना ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना गमवावा लागला. याचबरोबर बालिश वक्तव्यांमुळे टीका देखील झाली. आता तर अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात तुफान राडेबाजी झाली असल्याचे वृत्त आले होते. या वृत्तात वादावादी हाणामारीत रूपांतरित झाली असल्याचेही सांगण्यात आले. बाबर आझमला तर काही खेळाडूंच्या समुहापासून वेगळं ठेवलं असल्याचं सांगण्यात आलं.
मात्र आता यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. यात या सर्व अफवा असून संघात असं काहीही झालं नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की पाकिस्तान संघात भांडण झालं आहे. याबाबतची अधिक माहिती ते अफगाणिस्तान सामन्यानंतर देतील असे आश्वासनही त्यांनी दिले.
या पोस्टनुसार दोन खेळाडूंमध्ये भांडण झालं अन् ते भांडण हाणामारीपर्यंत गेलं. संघात दुफळी वाढत आहे. संघातील काही खेळाडूंनी बाबर आझमला एकटं पाडलं आहे. यानंतर पीसीबीने त्वरित एक छोटेखानी पत्रक काढलं आणि ते ट्विट केलं. यात पीसीबी म्हणते, ‘देशाच्या संघात दुफळी असल्याचे वृत्त खोटं आहे.’