मुंबई | Bacchu Kadu Meets CM Eknath Shinde – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार काल (9 ऑगस्ट) पार पडला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे नाराज असल्याची माहिती समजताच आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली आहे. या भेटीनंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“नाराजी आहे असं नाही, थोडी नाराजी असतेच. पण इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती”, असं बच्चू कडू म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी फक्त मंत्रिपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे पाठिंबा दिला होता, जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करू. तसंच आश्वासन देण्यात आलं होतंं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती”.
“एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुम्हाला मंत्री करु असं आश्वासन देत शपथ घेतली होती. पहिल्या यादीत नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दुसरी यादी अडीच वर्षानंतर येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे दोन आणि दोन चार नाही तर पाच होतात असं देखील ते म्हणाले.