“जर मंत्रीमंडळ विस्तार होणारच नसेल तर, एक घाव, दोन तुकडे करा;” बच्चु कडू

मुंबई : (Bacchu Kadu On Eknath Shinde) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात विचारणा केली असता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी त्यावरून शिंदे सरकारला खोचक सल्ला दिला आहे. “मंत्रीमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी असून येत्या १५ तारखेपर्यंत या अडचणी दूर होतील आणि २१-२२ तारखेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल. सगळ्याच आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले होते.

दरम्यान बच्चू कडू म्हणाले, “शिरसाट यांनी कुठून बातमी आणली मला माहिती नाही. पण आता आम्हालाही असं वाटतंय की, एक तर तुम्ही विस्तार करूच नका, थेट सांगून टाका की विस्तार होणार नाही. सगळे शांततेनं सरकारसोबत राहतील. पण ते फूल काढायचं, खिशात ठेवायचं, पुन्हा काढायचं असं करू नका. काय तांत्रिक बाबी असतील, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी ते सांगून टाकायला हवं की अमुक तांत्रिक अडचणींमुळे विस्तार होऊ शकत नाहीये. सगळे ५०-६० आमदार कुणीही काही बोलणार नाही”, असं कडू म्हणाले.

“जर विस्तार नसेल होत तर स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. आणि जर विस्तार होत असेल, तर तो सरळ सरळ लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे”, असं बच्चू कडू म्हणाले

Prakash Harale: