“…तर अकेला बच्चू कडू काफी है”, मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मुंबई | Bacchu Kadu Reaction On Cabinet Expansion – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला आहे. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच दरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, “नाराज आहे असा विषय नाही, प्रत्येकाला वाटतं मी मंत्री बनलं पाहीजे. मला मंत्रिपदासाठी थांबवलं म्हणजे कायमचं थांबवलं नाही, काही दिवसासाठी थांबवलं आहे. एकत्र रहायचं म्हणजे समजून घ्यावं लागणार”.

काही अडचणी वरिष्ठांना असतील तर आपण समजदारी घेतली पाहिजे. मला शब्द दिला होता, ते करतो म्हणले होते. मंत्रीपद देतो म्हणून हा शब्द मला दिला होता. हा शब्द जरी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पाळला गेला नाही तरी मला विश्वास आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा मंत्रीपद मिळेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा मला स्वत: फोन आला होता त्यांनी मला सगळं सांगितलं. मी त्यांना बोललो काही हरकत नाही. आता मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा लागेल, नाहीतर अडचण हाईल. तुम्हाला जर या पदावरून काढलं तर तुमच्यात नाराजी राहणार नाही ? थोडीशी नाराजी असतेच ती दूर होईल. नाराजी दूर नाही झाली तर अकेला बच्चू कडू काफी है, असं देखील बच्चू कडू म्हणाले.

Sumitra nalawade: