बच्चू कडूंचं पुन्हा राजकीय भूकंपबाबत सूचक विधान! म्हणाले… “पुन्हा वादळ येईल आणि…”,

अमरावती : (Bachhu Kadu On Mahavikas Aaghadi) सोमवारी महाराष्ट्र दिनी (१ मे) मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली आहे. या सभेला ठाकरेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

‘वज्रमूठ’ सभेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाबाबत मोठं भाष्य केलं आहे. वज्रमूठ सभेत सगळे पक्ष एकत्र दिसत असले तरी येत्या काळात कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही. राज्यात लवकरत पुन्हा वादळ येईल आणि ‘वज्रमूठ’ तुटेल, असं सूचक विधान प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी केलं.

‘वज्रमूठ’ सभेवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “आज सभा घेतली आहे, पण येत्या काळात कोणता पक्ष कुठे जाईल? उद्या कोण कुठे असेल? हे सांगता येत नाही. राज्यात पुन्हा वादळ येईल आणि वज्रमूठ कधी तुटेल, हेही सांगता येत नाही. हे निश्चित आहे, असं मला वाटत नाही. सभेला इतक्या मोठ्या संख्येन लोक येत आहेत, पण नेते कुठे आहेत? राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फिरले. त्यावेळी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली आस्था निर्माण झाली होती. पण नेतेच गायब व्हायला लागले.”

बच्चू कडू यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत अजित पवारांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. मी जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहणार, असं विधान अजित पवारांनी केलं. या घडामोडीनंतर बच्चू कडूंनी महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय भूकंपाबाबत सूचक विधान केलं आहे.

Prakash Harale: