“आमचे 40 आमदार परत गेले तरी राज्य सरकारला धोका नाही कारण…”, बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

मुंबई | Bacchu Kadu Speak About Maharashtra Cabinet Expansion – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही राज्यात या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “आमचे 40 आमदार परत गेले तरी राज्य सराकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळून सरकार बनवू शकतात”, असं धक्कादायक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच “मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी कुणाचीही भीती नाही. मंत्रिमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे.” असं म्हणत बच्चू कडू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

दोनच मंत्र्यांचे असलेले शिंदे -फडणवीस सरकार अपंग असल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. यावर दिव्यांगाना कमजोर समजणे हा पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. नानांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले, राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. मात्र, ते राज्याचा कारभार सांभाळण्यास सक्षम आहेत. काही अडचणींमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला गेला. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही. राज्यसरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या घोषणा केल्या आहेत. जर शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही पहिलं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि मग सरकारच्या, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: