शहरातील काही रस्त्यांवर अस्तित्वात असलेल्या पदपथांची झालेली दुरवस्था आणि अनेक रस्ते पदपथाविनाच असल्याने पुणेकरांवर ‘पदपथ असतो का?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही पदपथांवर एक प्रकारे पादचाऱ्यांची नाकाबंदीच करण्यात आल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील राजा असलेला पादचारीच सुविधांपासून वंचित असून त्याची ससेहोलपट होताना दिसत आहे. काही ठिकाणी पदपथ उखडले असून काही ठिकाणी मोठ्या झाडांनी पदपथ अडविला आहे. यामुळे पादचाऱ्यांना अनेक समस्या उद्भवतात. आठ वर्षांंनंतरही पादचारी मार्गासाठीचे धोरण अंंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असल्याने पादचाऱ्यांना पदपथावरून चालतानाही जीव मुठीत धरून जावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत एक हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांलगत पादचाऱ्यांना विनाअडथळा चालण्यासाठी ५७४ किलोमीटर लांबीचे पदपथ आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक पदपथांंवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील मध्यवस्तीतील कसबा पेठ, अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आदी ठिकाणी दुकाने, खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनी पदपथ व्यापले आहेत.शहरातील पदपथांवरून सहज चालता यावे, यासाठी महानगरपालिकेने ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा धोरण’ तयार केले असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यानेच पादचारी ‘रस्त्यावर’ आले असल्याचे शहरातील चित्र आहे.
नळ स्टाॅप चौक, जंगली महाराज रस्ता (माॅडर्न महाविद्यालयाजवळ), बिबवेवाडी (भापकर पेट्रोल पंपाजवळ) या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने महापालिकेने पादचारी भुयारी मार्ग तयार केले आहेत. मात्र, या भुयारी मार्गांचा वापर केला जात नसल्याने ते बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे स्थानक येथील भुयारी मार्गांमध्ये दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना चालणे मुश्कील होत असल्याचे दिसून येते.