‘बधेकर-सोलारीस करंडक’ : अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धा
पुणे : रविंद्र पांड्ये टेनिस अॅकॅडमी तर्फे आयोजित ‘बधेकर-सोलारीस करंडक’ अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१२ वर्षाखालील) स्पर्धेत नमिश हुड आणि रिस्ता कोंडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून गटाचे विजेतेपद संपादन केले. नमिश याने एकेरीसह दुहेरी गटामध्ये विजेतेपद मिळवून स्पर्धेमध्ये दुहेरी मुकूट पटकावला.
कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात सहाव्या मानांकित निमिश हुड याने बिगर मानांकित तनिष्क देओरे याचा ६-३, ७-६(५) असा पराभव केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पहिला सेट ६-३ असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली. दुसर्या सेटमध्ये मात्र तनिष्क देओरे याने जोरदार टक्कर दिली. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या या सेटमध्ये नमिशने तनिष्कवर ७-६(५) असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
मुलींच्या गटात दुसर्या मानांकित रिस्ता कोंडकर हिने सातव्या मानांकित वीरा हरपुडे हिचा ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीच्या मुलांच्या गटात नमिश हुड आणि स्मित उंड्रे या जोडीने निर्वाण मारगाना आणि रूद्रांश श्रीवास्तव यांचा ६-३, ६-१ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बधेकर ग्रुपचे ऋषिकेश ढोगाळे आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली, जहांगिर हॉस्पिटलचे सेंटर मुख्य रितेश चांदोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार चाफळकर, आशिष जोगळेगर, राजेश गडदे, सारीका गडदे, एआयटीए निरिक्षक तेजल कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंना करंडक, मेडल्स् आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आली.