मोठी बातमी : बागेश्वर बाबांनी मागितली माफी, तुकाराम महाराजांवर केलेले वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण

भोपाळ : Bageshwar Dham On Sant Tukaram : मागील काही दिवसांपासून आपल्या चमत्कारांनी आणि कट्टर हिंदुत्वाच्या वक्तव्यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri Bageshwar Dham) मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. सर्वत्र त्यांच्या चर्चा आहेत. मात्र, मागील दोन दिवसांपासून त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात मात्र त्यांच्याविरुध्द संताप व्यक्त केला जात होता. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांना त्यांची पत्नी खूप मारायची असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात होता. वारकरी संप्रदायाकडून देखील धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम आणि वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी विनंती केली जात होती.

धीरेंद्र शास्त्री यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आता त्यांनी आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी आपल्याला अशी माहिती कशी मिळाली याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संत तुकाराम यांच्याबद्दल त्यांनी जी गोष्ट ऐकली होती त्याबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. तसेच संत तुकाराम हे महान संत असून ते माझे आदर्श असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले बागेश्वर बाबा ?

‘संत तुकाराम हे एक महान संत आहेत. ते माझे आदर्श आहेत. मी तुकारामांबद्दल एका पुस्तकात त्यांच्यासंबंधी एक गोष्ट वाचली होती. त्यांची पत्नी विचित्र स्वभावाची होती. तसंच ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती. तुकारामांना त्यांची पत्नी ऊस आणायला पाठवते. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने तुकारामांना त्यांची पत्नी मारते. त्यात उसाचे दोन तुकडे होतात. ही कहाणी मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या कहाणीमुळे वारकारी संप्रदायाच्या अनुयायींच्या भावना दुखावल्या. यामुळे मी माझे शब्द मागे घेतो’, असं बागेश्वर यांनी म्हटलं आहे.

कोणत्या वक्तव्याने झालता वाद ?

‘संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महात्मा. त्यांची पत्नी रोज त्यांना मारायची. रोज काठीने मारत होती. तुम्ही बायकोचा रोज मार खाता, लाज वाटत नाही? असा प्रश्न कुणीतरी तुकारामांना एकदा विचारला होता. ही तर परमेश्वराची कृपा आहे, मला मारणारी बायको मिळाली, असं उत्तर तुकारामांनी दिलं होतं. यात कृपा कुठली? असं तुकोबांना पुन्हा विचारण्यात आलं. प्रेम करणारी बायको मिळाली असती तर देवाच्या प्रेमात पडलो नसतो, बायकोच्या मागे फिरत राहिलो असतो’, असं तुकारामांनी सांगितल्याचं बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं होतं.

Dnyaneshwar: