पुणे | Pune Crime – काही महिन्यांपूर्वी पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली होती. पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरूणानं तरूणीवर कोयत्यानं हल्ला केला होता. त्यानंतर या हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी अटक केली होती. तर आता या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
शंतनू लक्ष्मण जाधव असं जामीन मंजूर झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी आरोपीला जामीन मंजूर केला आहे. आरोपीनं अॅड. ओंकार फडतरे, अॅड. अभिषेक हरगणे, अॅड स्वप्नील चव्हाण यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता आरोपी जाधवला जामीन मंजूर झाला आहे. तर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अंटीवर आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
27 जून 2023 रोजी सदाशिव पेठेत आरोपी जाधवनं तरूणीवर कोयत्यानं वार केले होते. त्यावेळी काही तरूणांनी तरूणीचा जीव वाचवत आरोपी जाधवला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर पीडित तरूणीनं आरोपीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे जाधवविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली होती.