मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तैलचित्र अनावरण सोहळा 23 जानेवारी 2023 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. या आमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं या कार्यक्रम पत्रिकेत नाव छापण्यात आलेलं नाही. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे ठाकरे गटामधून संताप व्यक्त केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं तैलचित्र लावण्यामागे राजकारण आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
या आमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार शासकीय पदं असलेल्या व्यक्तींची नाव छापण्यात आली आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि उपसभापती यांचा समावेश आहे. आम्ही ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच सन्मानपूर्वक आमंत्रित केलं आहे, असं विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. परंतु व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार हे अद्याप सांगितलेलं नाही. पुढील एक दोन दिवसात ठाकरे कुटुंबियांना, आमदार-खासदारांना तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण पाठवलं जाणार आहे. आता या सोहळ्याला उद्धव ठाकरे हजर राहणार का हे पाहावं लागेल.