मुंबई : (Eknath Shinde On Shivsena MLA) २०१९ ला शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेत राष्ट्रवादी-काॅंग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्यावेळी ‘मविआ’सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते राष्ट्रवादी-काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमुळं त्यांची ही हुकली. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. याबाबत खुलासा शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना केला.
दरम्यान, सोमवार दि. ४ रोजी शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत भाषण केलं. बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला मीच संभाव्य मुख्यमंत्री होणार असे पक्षाकडून मला सांगण्यात आलं. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नये. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती. असायचं काही कारण नाही.
पुढे ते म्हणाले, आम्ही शिवसैनिक आहोत आणि आम्ही नेमहीच बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक राहू. त्यांनी काही जुन्या गोष्टींकडे लक्ष वेधले, तुम्ही सगळे त्यांच्यासोबत गेले आहात ज्यांनी बाळासाहेबांना ६ वर्षांसाठी मतदान बंदी आणली होती, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांना टोला लगावला. यावेळी शिंदे यांनी अनेक घटनांचा उलघडा केला.