मुंबई : (BalasahebThorat On Shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील आपली भूमिका सेनेनं स्पष्ट केली आहे. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला. यामुळं महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा आहे. स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी यामुद्द्यावरील हा लढा नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. ज्या भाजपनं शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे. पण तरीही शिवसेनेनं भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? असा सवाल काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.