महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि मराठी संगीत रंगभूमीचे अध्वर्यू नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे नाव असलेले बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे नाट्यरसिक आणि कलाकारांसाठी पंढरीच. पुण्याच्या सांस्कृतिक ठेव्यातील देदीप्यमान तुरा असलेले बालगंधर्व रंगमंदिर नाट्यसेवेची ५४ वर्षे पूर्ण करून ५५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. मात्र, त्याची महती आजही कायम आहे. बालगंधर्व रंगमंदिर ५४ वा वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन भारतरत्न
दुसऱ्या पर्वामध्ये पहिले पुष्प गुंफताना महकनिर्मित ‘‘दोन भारतरत्न’’ संतवाणी भक्तीपुष्पमध्ये दिवंगत लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. याचा सकाळी १० ते १२ भक्ती-प्रीतीसंगम, सुसंवादमध्ये आनंद देशमुख, गायक चैतन्य कुलकर्णी आणि मनीषा निश्चल यांनी भक्तिगीते सादर केली. यामध्ये श्री विठुरायाच्या अभंगाने सुरुवात झाली. यामध्ये विविध भक्तिगीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमास अाबालवृद्धांनी उपस्थिती दर्शवली.
लावणी महोत्सव
खास महिलांसाठीच्या लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वृषाली सातपुते, अर्चना जावळेकर, नमिता पाटील इत्यादी लावणीसम्राज्ञी आपली कला सादर करणार आहेत, त्याचप्रमाणे गायिका शिल्पा, स्वाती शिंदे, तेजस्विनी लोकरे आदींनी लावणी सादर केली. यामध्ये या रावजी बसा भावजी…, तुम्हावर केली मर्जी बहाल…, येऊ कशी तशी मी नांदायला यांसारख्या नामवंत लावण्या यावेळी सादर झाल्या. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांची लाभली. या कार्यक्रमाचे निवेदन शोभा कुलकर्णी यांनी केले.
माधव अभ्यंकर (अण्णा) व मेघराज राजेभोसलेंनी धरला ठेका
बप्पी लहरींच्या नावाजलेला थानेदार चित्रपटातील तम्मा… तम्मा…दे… दे… या गाण्यावर माधव अभ्यंकर (अण्णा रात्रीस खेळ चालेफेम) यांच्यासह बालगंधर्व रंगमंदिर परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनाही गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनीसुद्धा ठेका धरत या गाण्यावर डान्स केला.