महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे सध्याचे चित्र ओंगळवाणे वाटावे असे झाले आहे. कलाकारांना मूलभूत सुविधा मिळत नाहीतच, प्रेक्षकांनाही नाटक पाहताना डासांच्या गुणगुणण्याचे संगीत कानांमध्ये ऐकू येते. कित्येक दिवस ही परिस्थिती असतानादेखील दुर्लक्ष कायम आहे.
पुणे : रंगमंदिरामध्ये डासांचा प्रादुर्भाव, उंदीर आणि घुशींचा सहजपणे वावर, तुटके कमोड, साचलेली घाण आणि तुटलेले फ्लश टँक हे चित्र सध्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दैनंदिन पाहावयास मिळते. ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ऐवजी ‘आबाळगंधर्व रंगउंदीर’ असे नाव ठेवायला मनपाचं काही ‘अडलंय का?’, असा सवाल रंगकर्मींनी उपस्थित केला आहे. प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे आणि नाट्यनिर्मात्या व अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी या दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला आहे.
पेठे म्हणाले, आम्ही नुकताच ‘अडलंय का? नाटकाचा प्रयोग केला. रंगमंचावर संवादफेक करण्यासाठी तोंड उघडले की, डास तोंडात जाईल की काय ही धास्ती होती. केवळ कलाकारांनाच नाही, तर प्रेक्षकांनाही डासांनी हैराण केले होते. इतकी आबाळ कशासाठी आहे? कमोड तुटलेले असून, घाण साचलेली आहे. फ्लश टँक तुटलेले आहेत. हे आपल्या शहरातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानतो आपण, तर किमान गोष्टींची पूर्तता का करता येत नाही? हे काही बरोबर नाही. आम्हाला त्याचा संताप आला आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे चांगल्या सुविधा असल्याबद्दल कौतुकदेखील केले आहे.
देसाई म्हणाल्या की, नाटकाच्या सेटचे साहित्य ठेवण्यासाठी निर्मात्यांकडून गाळ्यासाठी वार्षिक २४ हजार रुपये शुल्क आकारले जाते. तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. उंदीर-घुशींचे साम्राज्य असते. पावसाळ्यामध्ये तर पाणी जाऊन साहित्याची नासधूस होईल का याची धाकधूक असते. महिला कलाकारांसाठी कपडे बदलण्याच्या खोलीचे पडदे काढून टाकण्यात आले आहेत. स्वच्छतागृहाची दारे मोडकी आहेत. टाकी अखंड वाहत असते. मेकअपसाठी दिवे आवश्यक असताना त्या खोलीमध्ये ट्यूबलाइट लावण्यात आल्या आहेत. त्यावर दिवे चोरीला जातात, असे कारण सांगितले जाते. प्रयोग सुरू असतानाच अनेकदा डागडुजीच्या कामांचे, ठोकण्याचे आवाज ऐकू येतात.
वातानुकूलन यंत्रणा सुरू केली जाते, पण नाटकाच्या दुसर्या अंकाच्या मध्यावर वातानुकूलन यंत्रणा बंद केली जाते. ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, हेदेखील वास्तव आहे. उपाहारगृह, पार्किंग समस्या सुटण्याची चिन्हे दिसतच नाहीत, याकडे रंगकर्मींनी लक्ष वेधले. बालगंधर्व रंगमंदिराची दुरवस्था गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहे, ही अवस्था संतापजनक आहे. त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याचा अर्थ पालिकेला मुद्दाम लक्ष द्यायचे नाही का, असा सवाल उपस्थित होतो.