मुंबई | सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या पोस्टरला प्रेक्षकांनी पसंती दिली. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत अमेय खोपकर यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
अमेय खोपकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले. या पोस्टरवर ते या चित्रपटाची प्रस्तुती करत आहेत, असे लिहिलेले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले, “लाख भक्त एक रक्त, सज्ज सक्त कडकडे, आरंभी युद्धाच्या, विजयाचे चौघडे… सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा, ‘बलोच’ ५ मेपासून चित्रपटगृहांत!” त्यांनी ही पोस्ट शेअर करताच सोशल मिडीयावर प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.