जिनेव्हा : आघाडीपटू रॉबर्ट लेवांडोवस्कीच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत पिछाडीवरून इंटर मिलानला ३-३ अशा बरोबरीत रोखले. मात्र, या निकालानंतरही बार्सिलोनाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपले आव्हान कायम राखण्यासाठी बार्सिलोनाने उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आणि इंटरने गुण गमावणे गरजेचे आहे.
इंटरविरुद्ध उस्मान डेम्बेलेने (४०व्या मिनिटाला) गोल करत बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात निकोलो बारेला (५०व्या मि.) आणि लॉटारो मार्टिनेझ (६३व्या मि.) यांनी गोल केल्यामुळे इंटरने २-१ अशी आघाडी मिळवली. ८२व्या मिनिटाला लेवांडोवस्कीने बार्सिलोनाकडून बरोबरीचा गोल झळकावला. यानंतर रॉबिन गोसेन्सने (८९व्या मि.) गोल करत इंटरला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, भरपाई वेळेत लेवांडोवस्कीने पुन्हा गोल केल्यामुळे बार्सिलोनाने हा सामना बरोबरीत सोडवला.