भटकी कुत्री आता थेट ‘कुलुपबंद’…!

Rashtra Sanchar Impact
पुणे : भटक्या कुत्र्यांनी गेल्या काही वर्षांपासून शहर आणि उपनगरात हैदोस घातल्यानंतर महापालिका प्रशासनाला उशीरा का होइना पण जाग आली आहे, त्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी आणि त्यांच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी या भटक्या कुत्र्यांची रवानगी आता निवारा केंद्रात करण्यात येणार आहे. यासंदर्भात आता थेट महापालिका आयुक्तांनीच दखल घेतली असून आरोग्य विभागाला महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
पूर्वी भटक्या कुत्र्यांच्या धोका रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी जास्त असायचा. मात्र, मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांकडून दिवसाही नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. मागील आठवड्यात आंबेगाव पठार येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये कुत्र्यांनी पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना घडली.
भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने कुत्र्यांसाठी शेल्टर (निवारा केंद्र) उभारण्यात येणार आहेत.कुत्र्यांच्या शेल्टरची कायमस्वरूपी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये व्यवस्था करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
कुत्र्यांच्या शेल्टरची कायमस्वरूपी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये व्यवस्था करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कुत्र्यांच्या सर्वाधिक त्रास रात्री उशिरा कामावरून घरी जाणार्‍या आणि पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांची नियुक्ती केली जाते.
कुत्र्यांच्या नसबंदीवर महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. तसेच, नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नसबंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. महापालिकेने यापूर्वी 2018 मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. त्यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या तीन लाख 15 हजार होती. त्यानंतर आता महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या 34 गावांमधील भटक्या कुत्र्यांची त्यात भर पडली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय विभागाने गेल्या आठ महिन्यांत शहरातील 37 हजार 495 भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला आहे.

Rashtra Sanchar Digital: