पुणे : बँक ऑफ बडोदा निवृत्त अधिकारी संघटनेच्या स्पंदन इ बुलेटिन या द्वैमासिकाचा शुभारंभ संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जतिल पटेल, बडोदा यांचे हस्ते करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रविंद्रन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रीय उपसचिव व्ही. बी. चव्हाण, पुणे यांनी द्वैमासिकाची आवश्यकता सांगत यात बँकिंग, निवृत्तांचे प्रश्न याबरोबरच निवृत्तांच्या कुटुंबांचे, पुढील पिढीच्या विषयीचे लेख, विविध साहित्य, काव्य, आगळे उपक्रम यांचा अंतर्भाव असून, नातवंडांसाठी पण स्वतंत्र विभाग असल्याचे सांगितले.
पुणे संघटनेचे महासचिव वाय. एन. देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. मुख्य संपादक शशांक वाघ यांनी इ-बुलेटिनचा प्रारंभ अनेक सदस्यांच्या मागणीनुसार केल्याचे अधोरेखित करीत सभासदांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे जतिल पटेल यांनी निवृत्तांच्या सुदृढ मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी संघटनेने असे विविध उपक्रम राबविण्याची गरज प्रतिपादन केली. याच समारंभात वयाची ७५ आणि ८५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. स्पंदनचे संपादक मंडळाचे सदस्य गीतांजली हत्तंगडी, संजीव कुसुरकर, संजय देशपांडे, संघटनेचे पदाधिकारी, तसेच निवृत्त सदस्य मोठ्या संख्येने समारंभास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली हत्तंगडी यांनी केले.