नवी दिल्ली : (BBC Delhi Office IT Raid) मागील काही दिवसांपासून बीबीसीने प्रदर्शित केलेल्या “इंडिया- द मोदी क्वेश्चन” या माहितीपटाची चांगलीच चर्चा होत आहे. या माहितीपटातून गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. याच कारणामुळे भारतात बीबीसीच्या प्रसारणावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, असे असतानाच आता बीबीसीच्या मुंबई आणि दिल्ली येथिल कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाकडून बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीमधील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आयकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात तपासणी तसेच चौकशी करत असल्याचे म्हटले जात आहे.
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे तर आयकर विभागाने या धाडी टाकल्या नाहीत ना? असा प्रश्न सामान्य नागरीकांत उपस्थित केला जात आहे.