बीड : (Beed BJP district president Bhagirath Biyani committed suicide) भाजप जिल्हा अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण मात्र, अद्याप समोर आलेलं नाही. बीड शहराच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून भगीरथ बियाणे यांच्याकडे बघितले जात होते.
भगीरथ बियाणी हे भाजपचे निस्सिम कार्यकर्ते होते. ते शांत आणि मनमिळावू स्वभावाचे तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्वत्र परिचित होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केल. मुंडे कुटुंबाचे अतिविश्वासू कार्यकर्ते असल्यानं त्यांच्यावर बीडच्या भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
आज सकाळी पहाटेच्या सुमारास बियाणी हे आपल्या एका सहकाऱ्यासोबत मुंबईला चालले होते. मात्र काही अंतरावर गेल्यानंतरच ते बीडमध्ये परत आले आणि घरी आल्यानंतर सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली आणि दरवाजा तोडून कुटुंबीयांनी आत प्रवेश केला. यावेळी भगीरथ बियानी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आलं.