पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थानांना सुरुंग लावणार असल्याचा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. हंडेवाडी येथे भाजप पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी आ. भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळाभाऊ भेगडे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे, भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंंदर कामठे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांड्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील उपस्थित होते. आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेले, अन् महाविकास आघाडीचे खुनशी सरकार अस्तित्वात आले.
कोविड काळात महाविकास आघाडी सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार झाले. पण कोविडची साथही नियंत्रणात आली आणि आपले सरकारही आलं आहे. त्यामुळे सर्वांनी कसून कामाला लागावे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावून, त्यांची मक्तेदारी मोडीत काढू, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.