मुंबई | Best Bus Strike – गेल्या आठ दिवसांपासून बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप (Best Strike) सुरू होता. तर आता हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होताच हा संप मागे घेण्यात आला. याबाबतची घोषणा सर्व आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर एकत्र येत केली आहे.
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री बैठक झाली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली.
संप मागे घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. येण्या-जाण्याचा पास मोफत दिला जाणार, साप्ताहिक रजा, दिवाळी बोनस, वार्षिक वाढ मान्य केली, निवृत्त लोकांना सेवेत घेतलं जाणार नाही आणि आंदोलन केलं म्हणून कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यामुळे आम्ही संप मागे घेतला आहे. सामान्य माणसाचं सरकार आहे म्हणूनच सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. तर आजपासून सगळे कामगार कामावर जाणार असल्याचं, कामगारांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं.
दरम्यान, बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. कामगारांच्या या आंदोलनामुळे मुंबईकर त्रस्त झाले होते. मात्र, आता सरकार प्रशासनाला यावर तोडगा काढण्यास यश आलं आहे.