मुंबई : (Bhagat Singh Koshyari 12 mla appointmen letter Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. आता राजीनामा दिल्यानतंर त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांच्या काळात गाजलेला मुद्दा 12 आमदारांच्या फाईलवरील सही. जी अखेरपर्यंत त्यांनी केली नाही. त्यावरुन अजून वाद सुरुच आहे. अशातच यामागचे कारण स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठवली होती, पण राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त होईलपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिलीच नाही. कोर्टातही हे प्रकरण गेलं, पण त्यानंतरही भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण अजुनही तसंच प्रलंबित आहे.
विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. स्वाक्षरी न करण्याचं कारणही तुम्ही सांगितलं नाही. या प्रश्नाला उत्तर देताना कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले. महाविकासआघाडीची शिष्य मंडळ येत राहिलं. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेलं.
पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की, मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता. अशा शब्दात कोश्यारी यांनी कारण सांगत संताप व्यक्त केला.