मुंबई : काल (रविवार, १२ जानेवारी) देशातील १३ राज्यपालांच्या बदल्यांमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील महाराष्ट्रातून गेले. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आणि महाराष्ट्रात विरोधकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. भगतसिंह कोश्यारी यांचा विरोधकांना मोठ्या प्रमाणात राग होता. कारण कोश्यारींनी अनेकदा महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आंदोलने देखील काढली होती. काल कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर सगळ्याच नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, आज स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील लोकांबद्दल वक्तव्ये केले आहे.
काय म्हणाले कोश्यारी ?
महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत, शहरात असेल गुंडागर्जी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील, पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत. तुमच्याकडे देशपांडे आहेत, तर आमच्याकडे पांडे आहेत, तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.