पुणे :
घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणे, राडारोडा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे आदी विविध प्रकारच्या कृत्यांसाठी संबंधित नागरिकांकडून दंड वसूल केला जातो. याअंतर्गत दोन ऑक्टोबर २०२३ पासून आजपर्यंत एकूण ७२,७७८ प्रकरणांमध्ये चार कोटी तीन लाख ७१ हजार ९२१ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच एकूण ६,२६८ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे महापालिकेने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दंडात्मक कारवाई केली जाते. मध्य प्रदेशातील इंदौर शहराच्या पार्श्वभुमीवर, पुणे महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर वचक बसावा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता यावी, यासाठी भरारी पथक तयार केले. या पथकाला शहरात कारवाई करणे सोईस्कर व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त वाहने उपलब्ध करून दिली होती. घनकचरा व्यवस्थापन विभाग पथकासाठी मंगळवारी आणखी दहा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता एकूण १८ गाड्यांद्वारे ही भरारी पथके शहराच्या विविध भागांत फिरून अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.
भरारी पथका (Bharari squad) च्या ताफ्यात आणखी दहा गाड्यांचा समावेश
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठी मंगळवारी आणखी दहा गाड्या महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भरारी पथकाकडील गाड्यांची संख्या १८ झाली आहे. त्यामुळे आता शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाईला वेग देण्यास उपयोग होणार आहे. परंतु या गाड्यांच्या माध्यमातून खरेतर जनजागृती होणे आवश्यक आहे .
दंडात्मक कारवाई
मंगळवारी दहा नव्या गाड्यांचे लोकार्पण महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ एकचे उपायुक्त राजू नंदकर, प्रसाद जगताप आणि मुकुंद बर्वे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गाड्यांचा वापर करून नागरिकांमध्ये जागृती करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना डॉ. भोसले यांनी केली.