राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा देशभर पसरली आहे. सोमवारी भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झाली. या यात्रेचा प्रवास नांदेडमधून सुरू झाला आहे. दरम्यान, या पदयात्रेवेळी राहुल गांधी यांनी विरोधकांना आव्हान देखील केले आहे. या देशामध्ये मागील काही वर्षांपासून, द्वेष, क्रोध आणि हिंसेचे वातावरण तयार केले जात आहे. त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निघालेली ही भारत जोडो पदयात्रा आता कोणीही रोखू शकणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांचा चांगला प्रतिसाद देखील पाहायला मिळत आहे.
१४ दिवस चालणार यात्रा..
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार असल्याची माहिती आहे. यात्रेमध्ये अनेक सामाजिक संघटनांचाही सहभाग दिसत आहे.
भारत जोडो पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते उपस्थित राहतील का, याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहभागाविषयी साशंकता आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही काहीसा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट होते आहे. दि. १० नोव्हेंबर रोजी या पदयात्रेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड. राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे, आमदार रोहित पवार सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेला राष्ट्रवादेचे बळ मिळणार असल्याचे निश्चित होत आहे.
महाराष्ट्रात सुरू झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. असे असले, तरी या पदयात्रेत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणते प्रमुख नेते सहभागी होणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना न्युमोनिया झाल्यामुळे छातीत मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. त्यामुळे पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या पवार यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
रूग्णालयात असताना पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थिती लावली होती. सध्या पवार यांची तब्येत पाहता ते पदयात्रेत सहभागी होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. पवार जरी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसले, तरी राष्ट्रवादीकडून दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदयात्रेला राष्ट्रवादीचे बळ दिसून येत आहे.
यात्रेत ठाकरे गटांतील नेते कोणी उपस्थित राहणार का याबाबत अधिक माहिती समोर आली नसली, तरी आदित्य ठाकरे या रॅलीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून ठाकरे कुटुंबीयाचाही यात्रेत सहभाग होणार असल्याचे निश्चित आहे. मात्र सभा आणि व्यग्र कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे यांच्या सहभागाबाबत साशंकता आहे.