अहमदनगर : (Bhartiy Kishan Sabha On State and Central Government) राज्यात परतीच्या पावसानं शेतीपीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय किसान सभा आक्रमक झाली आहे. यावेळी किसान सभेने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार, तसेच केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान यावेळी किसान सभेने म्हटलं आहे, राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर ३६ लाख हेक्टर वरील पिके मातीमोल झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा देत असून दिखावा करण्याचे काम करत आहे.
आज सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे येथे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सभेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी किसान सभेने केंद्रातील मोदी सरकारवरही हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे, असंही किसान सभेने म्हटले आहे.