पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण – ज्ञानसूर्याची अस्मिता असलेल्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या भिडेवाड्याचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. ना. अतुल सावे यांच्या पुढाकारातून हा प्रश्न अखेरच्या टप्प्यात आला असून, लवकरच याबाबत प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते आणि युवा शिवसेना शहरप्रमुख नीलेश गिरमे यांनी दैनिक राष्ट्रसंचारशी बोलताना दिली.
पुण्याच्या विद्येच्या माहेरघरात असलेली भिडेवाड्याची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे. मूळ जागामालक, घरमालक, भाडेकरू असलेले दुकानदार आणि परिसरातील काही लोकांचे मतभेद, त्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तसेच न्यायालयीन वाद यामुळे या जागेचा विकास रखडला होता.
“आता हा प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या भिडे वाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून रूपाला येईल, असा मला विश्वास आहे.”
— नीलेश गिरमे, ओबीसी समाजाचे नेते
आजपर्यंत अनेकदा शिक्षण प्रेमी समुदायाने तसेच उपेक्षित समाजाच्या अनेक संघटनांनी वारंवार या प्रश्नाचा पाठपुरावा केला. परंतु कुठल्याही सरकारने याबाबत इच्छाशक्ती दाखवली नाही. यंदा प्रथमच भाजप – बाळासाहेबांची शिवसेना सरकार आल्यानंतर नीलेश गिरमे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आणि सहकार मंत्री अतुल सावे यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घातले.
याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विश्वासात घेऊन सहकार मंत्री सावे यांनी पुढाकार घेत भिडेवाड्याच्या प्रश्नासंबंधात काही बैठका घेतल्या, तसेच अधिवेशनादरम्यान देखील सातत्याने यावर बैठका घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्या बैठकीमध्ये घर मालक आणि दुकानदार यांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचा मार्ग सावे यांच्या नेतृत्वाखाली सुचविण्यात आला. या घटकांना पर्यायी व्यवस्था करून देण्यासंबंधीच्या सूचना विभागांना देण्यात येत आहेत. लवकरच भिडे वाड्याचे काम सुरू करून, ही अस्मिता महाराष्ट्राच्या समोर एका नव्या रूपातून उपलब्ध होईल, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.