सध्या अर्थकारण वेगात आहे. विस्तार वाढतोय. पण विस्तार म्हणजे विकास असे काही हमखास सांगता येत नाही. उंचावरून जाणार्या मेट्रोची आधी सवय व्हायला हवी. सोयीस्कर प्रवास व्हायला हवा. उंचावर मेट्रो स्थानक असल्याने तिथंपर्यंत जाणे हे मोठे जिकिरीचे काम. घरापासून स्थानक एक किलोमीटर असले तरी तिथून चालत येण्याची सगळ्यांना सवय नाही.
साहेबांनी मेट्रोच्या डब्यात उभे राहून प्रवास केल्याचे छायाचित्र प्रकाशित झाले आणि शहरातील नव्या वाहतूकव्यवस्थेचा बिगुल आता वाजणार हे स्पष्ट झाले. ज्या शहराचे नाव सायकलचे शहर म्हणून प्रसिद्ध होते त्या शहरात आता लोक गरजेसाठी कमी आणि व्यायामासाठी अधिक सायकल वापरतात. पण सायकल सांभाळणे हे कामही सोपे नाही. सोसायटीत आपल्याच पार्किंगमध्ये मोटारीला खरोच येणार नाही, याची काळजी घेऊन ती पार्क करावी लागते. सायकल चालविणार्या लोकांकडे दोन पद्धतीने बघितले जाते. एक म्हणजे तुच्छतेने आणि दुसरे आदरपूर्वक. म्हणजे चौकात सिग्नल पडतो तेव्हा सायकलवाला आडवा आला तर मागचा किमती बाईकवाला तुच्छतेने बघतो आणि रागारागाने पुढे जातो, तर दुसरीकडे खास व्यायामी पेहराव करून कडेकडेने जाणार्या सायकलस्वाराकडे किंचित आदराने बघितले जाते. म्हणजे हे फिट अँड फाईन आहेत, आपण पण कधीतरी असे होऊ, ही भावना मनात असते.
तर आता मेट्रो आली तरी सायकल सोडायची नाही, असा निर्धार माझ्या एका ज्येष्ठ मित्राने केला आहे. कोथरुडात एका टुमदार बंगल्यात राहणारे हे माझे मित्र माझ्याकडे आले होते तेव्हा मला म्हणाले की, आमची मेट्रो सुरू झाली की, मी एक काम करणार आहे, ते म्हणजे मी सायकलवरून एम. ई. एस.पाशी येणार, तिथून रिटर्न तिकीट काढून वनाझपर्यंत जाणार आणि परत येणार. कल्पना भन्नाट आहे. फक्त एम. ई. एस.पाशी सायकल कुठे ठेवायची आणि ती परत येईपर्यंत नीट राहील ना, हा मोठा प्रश्न आहे. पुण्यात प्रश्न विचारणारे लोक खूप आहेत. त्यातले बरेचसे पुढे प्राध्यापक होतात आणि आयुष्यभर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारीत राहतात. म्हणून तर पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात. पण आमच्या कोकणातल्या मुलींना सासरघर म्हणून पुणे अधिक आवडते. तिथले आई-वडिलांचे आलिशान घर सोडून कोकणातल्या मुली पुण्यात वन बीएचके घरात यायला नकार देत नाहीत. परिणामी पुण्याच्या लोकसंख्येवर मोठा भार पडतो. तो भार कमी करण्यासाठी मेट्रो आली आहे. पण गंमत म्हणजे पुणेकरांनी मेट्रो मागितलेली नाही.
प्रशासन आणि राजकीय नेते यांनी शहराची गरज ओळखून ती आणली आहे. प्रश्न असा मनात आला, की साहेबांनी निगडी ते दापोडी असा प्रवास केला तो उभे राहून. यात काय दाखवायचे होते, हे माहिती नाही. साहेबांच्या या प्रवासाची ज्यांनी व्यवस्था केली त्या मेट्रोच्या अधिकार्यांना पुढे बढती वगैरे मिळण्यासाठी या दौर्याचा नक्की उपयोग होईल. पण प्रश्न असा आहे, की पुढे प्रवाशांनी मेट्रोत उभे राहूनच प्रवास करायचा आहे की काय? साहेबांनी उभे राहून प्रवास केल्याने बाकीच्या प्रवाशांवर तसा उभ्याने प्रवास करण्याचे आपोआपच बंधन आले. पुण्यात रेल्वे प्रवासाचा लोकांचा एकंदर अनुभव मोठा नाही. कारण मुंबईला डेक्कन क्वीनने नियमित जाणारे आणि पुणे, दौंड मार्गावर जाणारे लोक वगळले तर बाकीचे पुण्यातल्या पुण्यात आपापल्या दुचाकीने प्रवास करतात.
शहरात रेल्वे नावाचा प्रकार पहिल्यांदा येतो आहे. तशी पुण्यात पेशवे उद्यानात फुलराणी वगैरे आहे, पण त्यात लहानपणी कधीतरी बसल्याचे अनेकांना आठवत असेल एवढेच. अन्यथा रेल्वेची सवय तशी कमी. शिवाय दूरचा प्रवास असेल तर रेल्वेपेक्षा विमान अधिक सोयीस्कर पडते. पण त्याचा अनुभव असा आहे, की राजस्थानातून पुण्यात विमानाने यायला फक्त दीड तास पुरतो, पण लोहगाव येथून शहरात यायला किमान दोन तास जातात. आता मेट्रो आल्याने हा वेळ कमी होईल, असे कोणास वाटत असेल तर ते बरोबर नाही. वेळ कदाचित अधिक लागेल. निगडी येथून सुरू होणारी मेट्रो पुढे कात्रजपर्यंत जाणार आहे. मधला बराच टप्पा भूगर्भातून आहे. ऐतिहासिक शहर असल्याने भूगर्भात बरेच काही सापडत असते. मेट्रो तर नदीच्या खालून काढलेल्या बोगद्यातून जाणार आहे. फक्त आणखी काही वर्षे त्यासाठी वाट पाहावी लागेल.
कदाचित एक पिढी जगाचा निरोप घेईल आणि पुढची पिढी मेट्रोच्या सहवासात जन्म घेईल. कर्वे रस्त्यावर आलेल्या मेट्रोने पाच किलोमीटर अंतराचे स्वरूप बदलून गेले आहे. उंचच उंच पूल उभारले गेले आहेत. पूर्वी सातमजली इमारत म्हणजे पुणेकरांना मोठे आकर्षण वाटायचे. चक्क शनिवार पेठेत नदीच्या काठाजवळ अशी इमारत प्रथम उभी राहिली तेव्हा ती पाहण्यासाठी लोक रिक्षाने येत, शेवटचा मजला बघत, कोणीतरी दुसर्याला म्हणे… फार बघू नको, मान दुखेल. आता किमान चार मजले होतील, एवढ्या उंचावरून मेट्रो जाईल. राष्ट्रसंचारच्या कार्यालयात संपादकांच्या केबिनमधून मेट्रो दिसेल. मेट्रोच्या वेळेच्या आधारे बैठकीच्या वेळा नक्की करता येतील. पण सध्या पाच किलोमीटर एवढेच अंतर मेट्रो कापणार आहे. पूर्वी हे पाच किलोमीटर अंतर लोक सायकलवर सहज कापत असत.
भूगाव, पिरंगुट भागातून लोक सायकलने पुण्यात येत. शिवाय हा रस्ता बराचसा उताराचा आहे, त्यामुळे एकदा सायकलवर टांग मारली, की आरामात डेक्कनपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा. परत जाताना मात्र दमछाक. पूर्वी या भागात हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात बसने येण्याची सोय होती. आता अनेक प्रकारची वाहने आहेत. शिवाय कोथरूड हा परिसर बराचसा सलग आणि सखल असल्यामुळे इथे इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या. झटपट विकास झाला. आशियातील सर्वात जलद विकास होणारा परिसर असा उल्लेख झाला. चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था आल्या. उंच इमारतींमध्ये सधन वर्ग राहायला आल्याने घरकामासाठी माणसांची गरज निर्माण झाली. तिकडे मुळशी तालुक्यात जमिनींना भाव आला आणि तिकडे सधन झालेली कुटुंबे पुण्यात आली. आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या कुटुंबातील प्रत्येक माणसाकडे स्वतःची दुचाकी आहे. शिवाय एक किंवा दोन मोटारी आहेत. पूर्वी शहरात दुमजली घर असेल तरी त्याचे अप्रूप होते.
आता श्रीमंत मंडळींकडे दुमजली पार्किंग आहेत. कोणी किती वाहने बाळगावीत, यावर काही कायदेशीर बंधन नाही. शहरात त्यामुळे वाहनांच्या संख्येचा उद्रेक झालेला आहे. उत्तमोत्तम कंपन्यांची निर्मिती असलेली हजारो वाहने शहरात रस्त्याच्या कडेला पडलेली आहेत. भंगारात गेलेला हा विकास आहे. शहराच्या अशा वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी मेट्रो आली आहे. आता मोठे समारंभ, उद्घाटन, भाषण वगैरे होईल. मग सुरुवातीला हवशे, नवशे चला चला मेट्रो बघायला जाऊ म्हणून धावतील. मेट्रोच्या परिसरात उभ्या केलेल्या वाहनांमुळे पुन्हा ट्रॅफिक जाम… काय करणार मेट्रो येत आहे ना!
मनोहर सप्रे(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
मोबाईल नं. ः ९९६०४ ८८७३८