जालना | Jalna News – जालना (Jalna) जिल्ह्यातील लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता या घटनेनंतर सरकरानं मोठी कारवाई केली आहे. गृहमंत्रालयानं जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी (SP Tushar Doshi) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठीचार आणि गोळीबार केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसंच आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची दखल घेत गृह विभागानं जालना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे जालना प्रकरणातील ही पहिली मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे.