नवी दिल्ली : काही दिवसावर आलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात तयारी करणाऱ्या विरोधी गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण, दोन बिगर भाजपशासित राज्यांतील पक्षांना सरकारच्या विरोधात जायचं नसल्याचं वृत्त आहे. परंतु, भाजपनं उमेदवार जाहीर केल्यास पक्षांच्या अंतिम निर्णयात बदल होऊ शकतो, असंही बोललं जात आहे. जगनमोहन रेड्डी यांची आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी आणि ओडिशातील नवीन पटनायक यांची बीजेडी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांसोबत जाण्यास उत्सुक नसल्याचं राजकीय वर्तुळातुन बोललं जात आहे.
दरम्यान, पक्षातील नेत्यांनी त्यांना भाजपच्या विरोधात जायचं नसल्याचं सांगितलं आहे. विरोधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की, त्यांना सत्ताधारी पक्षाशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करायचा नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करण्यात रस नाही. सरकार समर्थक किंवा सरकारविरोधी म्हटल्यामुळं ते स्थापनेपासून दूर जाऊ शकतात, त्यामुळं त्यांना भाजपविरोधी भूमिका घ्यायची नाही, असं दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. एका अहवालानुसार, कमकुवत झालेली काँग्रेस वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसला प्रमुख बनविण्याच्या विरोधात आहेत. त्याच वेळी, काँग्रेसला त्या पक्षांचा पाठिंबा आहे, जे त्यांच्या मदतीनं राज्यांमध्ये सरकार चालवत आहेत. दरम्यान, बीजेडी आणि वायएसआर यांच्या निर्णयामुळं विरोधी गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.