मुंबई : (Eknath Shinde On Shivsena) मंगळवार दि. २८ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या काही नेत्यांनी रात्री उशिरा महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची राज्यपालांकडे मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी सरकारला वेळ न देता एका दिवसात अधिवेशन घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. याविरोधात सेनेचे वकील सुप्रीम कोर्टात गेले असून राज्यपालांनी घटनेच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, झालेल्या बैठकीत शिंदे म्हणाले, शिवसेनेचे ५० आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची काळजी नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, या देशात संविधानापुढे कोणी जाऊ शकत नाही. ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे. सध्या सुरु असलेल्या या सर्व न्यायालयीन लढाईत विजय आमचाच आहे. मुंबईत गेल्यावर प्रथम बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहे, असे या बैठकीत शिंदे यांनी बंडखोर आमदारांना संबोधित केले आहे.
महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात येण्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत. भाजपाने आता या राजकीय गोंधळात थेट एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील, असं विधान दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. उध्दव ठाकरे यांनी महविकास आघाडी तोडावी अशी कालपर्यंत आम्ही त्यांना विनंती केली, पण आता उशीर झाला आहे, असंही ते म्हणाले. ही गुवाहाटीतील शिंदे गटाची शेवटची बैठक असणार हा गट भाजपसोबत सत्तास्थापन करणार हे देखील या बैठकीत ठरवण्यात आले आहे.