मुंबई | जगप्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. प्रतिभेला संधी मिळवून देणारी स्पर्धा असं आयपीएलचं वर्णन केलं जातं. या स्पर्धेमुळे कित्येक उदयोन्मुख खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून क्रिकेटमधील बारकावे शिकण्याची संधी मिळाली. अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळालं. यादरम्यान दररोज अनेक रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत असून यानिमित्ताने क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बिग बॉस फेम मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मराठीतून कॉमेंट्री केली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॉस मराठीच्या सीजन 2 चा विजेता आणि बिग बॉस हिंदीच्या सीजन 16 चा उपविजेता ठरलेला शिव ठाकरे सध्या जिओ सिनेमावर एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. शिव ठाकरेने यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्रेटर म्हणून पदार्पण केले असून तो राजस्थान विरुद्ध दिल्ली संघाच्या मॅच दरम्यान मराठीतून कॉमेंट्री करताना दिसला. शिवला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहून त्याचे फॅन्स भलतेच उत्साहित झाले.
सध्या शिव ठाकरे याचा मराठीतून कॉमेंट्री करत असतानाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात शिव राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वालचे कौतुक करत आहे. यशस्वीने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सुरु असलेल्या आयपीएल 2023 च्या अकराव्या सामन्यात 31 चेंडूत 60 धावांची कामगिरी केली. यावेळी शिव म्हणाला, “यशस्वी सध्या चांगल्या फॉर्मात असून तो नेहमीच मैदानात उतरल्यावर त्याला मिळालेल्या संधीच सोन करतो”. मराठमोळ्या शिव ठाकरेचा हा अंदाज देखील त्याच्या चाहत्यांना आवडला आहे.