मुंबई | Bigg Boss Marathi 4 – ‘बिग बॉस मराठी 4’चा (Bigg Boss Marathi 4) महाअंतिम सोहळा (Grand Finale) काल (8 जानेवारी) दिमाखात पार पडला. तब्बल 100 दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप 5 सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), अक्षय केळकर, राखी सावंत (Rakhi Sawant), किरण माने (Kiran Mane) आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता. त्यानंतर वेगवेगळ्या टास्कमधून एक एक स्पर्धक बाहेर पडले आणि अखेर टॉप2 मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर राहिले. अखेर बाजी मारत अक्षय केळकर (Akshay Kelkar) बिग बॉस मराठी 4चा विजेता ठरला आहे. मात्र, चौथ्या स्थानावर राहिलेली अमृता धोंगडे (Amruta Dhongade) ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना भावूक झालेली पाहायला मिळाली.
कोल्हापूरच्या अमृता धोंगडेनं पहिल्या दिवसापासूनच आपल्या उत्कृष्ट खेळीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. परंतु, तिचं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचं स्वप्न अर्धवटच राहिलं. तसंच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अमृतानं तिच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिनं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “महाराष्ट्राची मिरचीकडून तुम्हा सर्वाचे खूप आभार. या प्रेमासाठी तुमची अमू कायम ऋणी राहील. वर्च्युअल भेट तर गेले 100 दिवस होतच होती…पण आता प्रत्यक्षात लवकरच भेटुया. प्रेम कायम ठेवा. ‘जाळ अन् धूर संगटच’…”, असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.