मुंबई | Kiran Mane – ‘बिग बाॅस मराठी 4’ (Bigg Boss Marathi 4) हे पर्व चांगलंच गाजलंय. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नुकताच बिग बाॅस मराठीच्या चौथ्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. हे पर्व जरी संपलं असलं तरी यातील किरण माने (Kiran Mane) हे सदस्य अजूनही चर्चेत आहेत.
या पर्वाच्या टाॅप 5 मध्ये किरण माने होते. किरण माने जरी ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकले नसले तरीही त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यांना ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं. परंतु, चाहत्यांच्या मानत त्यांचं स्थान कायम आहे. त्यामुळेच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर साताऱ्यात (Satara) त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. याबाबतची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
साताऱ्यात किरण मानेंचे काही होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. याचेच फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या होर्डिंगवर “माने या ना माने, दिल जीत गए किरण माने…! आपल्या साताऱ्याच्या वाघानं बिग बॉस सीझन 4 मध्ये आपल्या जीगरबाझ खेळानं, सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!”, असं लिहिलं आहे. तसंच किरण मानेंच्या या होर्डिंगनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.