राजकीय हालचालींना वेग; सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले आहेत. विविध संस्थांनी संमिश्र अंदाज व्यक्त केले आहेत. त्यामुळे निकालानंतर समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील रणनिती ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच सत्तारूढ महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून राज्यात आपल्या आघाडीचीच सत्ता येईल, असा दावा करण्यात आला. दोन्हीकडून भेटीगाठी, खलबते व बैठकांचा सपाटा सुरू आहे. दुसरीकडे, दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरात निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर उमेदवारांसह अपक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

सत्तास्थापनेच्या शर्यतीत काही जागा कमी पडल्या तर या उमेदवारांच्या मदतीने सत्ताशिखर गाठणे, अशी त्यामागील भूमिका आहे. विशेष म्हणजे, निवडणूक निकालानंतर आपापल्या आमदारांची व्यवस्था करण्यासाठी महायुती आणि ‘मविआ’ने हॉटेल्सचे बुकिंगही आधीच करून टाकले आहे. निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या ‘एक्झिट पोल ‘मध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तथापि, महाविकास आघाडीने त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या पातळीवर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांसोबत जाण्यासंबंधीचे संकेत दिल्यामुळे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोबतच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, शिरसाट यांचे ते वैयक्तिक मत असावे, असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी शिरसाट यांचे संकेत आणि त्यानंतर दरेकरांनी दिलेले स्पष्टीकरण यावरून ‘मविआ ‘मध्ये खूप काही शिजत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rashtra Sanchar: