पुणे : महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने भाजप आणि मनसे यांच्यात युती होण्याचे संकेत मिळत आहेत. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात भेट होण्याच्या अगोदर दोन दिवस पुण्यातही माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि मनसे नेते वसंत मोरे यांची भाजप कार्यालयात भेट झाल्याने पुण्यातही भाजप मनसे एकत्र लढणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली.
भाजपमधील दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान केले. हे घडत असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांत शिवसेनेत उभी फूट पडताना दिसत आहे. शिवसेना फुटत असताना मनसेचे नेते मात्र अधूनमधून शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर टीका करीत आहेत. त्याचवेळी भाजपच्या बाजूने बोलताना दिसत आहे. मनसे नेत्यांची भाजपपूरक भूमिका ही अलीकडच्या काळात लक्षणीय आहे. याच काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत काय घडले याचा तपशील आलेला नाही आणि दोन्ही बाजूंनी यावेळी राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगितले जात आहे. मात्र यावेळी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत आगामी रणनीतीबाबत चर्चा झाल्याचे निश्चित आहे.
मुंबईत घडलेल्या बदलाचा आणि गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे घेत असलेल्या राजकीय भूमिकेबाबत पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे यांच्यात युती होईल असे संकेत मिळत आहेत. भाजपच्या पुणे कार्यालयास नुकतीच मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांनी भेट दिली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी समाजमाध्यमातून या भेटीबद्दल माहिती दिली. राज्यस्तरावर भाजप आणि मनसे यांच्यात संवाद सुरू असतानाच पुण्यात एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला धक्का देण्याचा भाजप-मनसेचा प्रयत्न राहील असे चित्र सध्या दिसते आहे. पुण्यात भाजपची चांगली ताकद आहे, पण मनसेसोबत आल्यावर अजून बळ वाढणार आहे.