खा. धनंजय महाडिक विठ्ठलच्या रणांगणात सक्रिय होणार

FILE PHOTO

विठ्ठल व भीमा परिवाराची मोट बांधणार :

पंढरपूर – PANDHARPUR NEWS | राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. यामुळे कोल्हापूर व पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार आहे. विठ्ठल व भीमा परिवाराचे मार्गदर्शक खा.धनंजय महाडिक विजयी झाल्याने परिवारात उत्साह पसरला आहे.दोन्ही कारखाना निवडणुकीत खा.महाडिक यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असून कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार आहे.

विठ्ठल कारखान्याची गेल्या पंधरा वर्षांपासून निवडणुकीत खा.धनंजय महाडिक यांनी लक्ष घालून महत्वाची भूमिका बजाविली होती. यामुळे चेअरमन आ.स्व. भारत भालके यांचे पॅनल विजयी झाले होते. विठ्ठल परिवारात त्यांना महत्वाचे स्थान आहे. सध्या विठ्ठल कारखाना निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. विठ्ठल परिवारात फूट पडली आहे. भगिरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील, दिपक पवार यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. यामुळे युवराज पाटील, गणेश पाटील यांनी निवडणुकीत पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

विठ्ठल परिवाराचे नेते खा.महाडिक असल्याने ते निवडणुकीत लक्ष घालून भालके, पाटील यांना एकत्र आणून एकच पॅनल उभा करण्यासाठी प्रयत्न करतील असे दिसून येत आहे. कारखाना निवडणुकीत विठ्ठल परिवाराचा पॅनल विजयी झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश मिळविणे सोपे होणार आहे. म्हणून खा.महाडिक विठ्ठल कारखाना निवडणुकीत दोन्ही गटात समन्वय साधून महत्वाची भूमिका बजाविणार आहेत.

भगिरथ भालके, कल्याण काळे हे राष्ट्रवादीचे असले तरी खा.महाडिक त्यांना बरोबर घेऊन पंढरपूर व मोहोळ तालुक्याचे राजकिय मोर्चेबांधणी करणार आहेत.कारखाना निवडणुकीत विठ्ठल परिवाराचा पॅनल विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. विठ्ठल व भीमा परिवाराचे विरोधक परिचारक/पांडुरंग परिवाराचा गट सक्षमपणे उभा आहे. यामुळे परिचारकांना शह देण्यासाठी खा.महाडिक दोन्ही तालुक्यात ताकद वाढविण्याचा तसेच भीमा कारखान्याच्या निवडणुकीचाही कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याने दोन्ही कारखान्यांवर आपले वर्चस्व राखण्यासाठी खा. महाडिक यांचे प्रयत्न राहणार आहेत. लवकरच याबाबत बैठका घेऊन प्रत्येक गटा-तटाशी भेटून ते मोर्चेबांधणी करणार आहेत.

एकंदरीत खा.धनंजय महाडिक यांच्या विजयाने विठ्ठल व भीमा परिवारातील नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. दोन्ही परिवार एकसंघ ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. आता खा. महाडिक कोणता चमत्कार करणार याकडे लक्ष लागले आहे.

Dnyaneshwar: