‘…भाजपाने इंधन दरवाढीविरोधातही आंदोलन करावं’- एकनाथ खडसे

मुंबई : राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाचं संकट महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अधिक दाहक होण्याची चिन्हं दिसत असतानाच आज भाजपाने जळगावमध्ये भारनियमनाविरोधात आक्रोश आंदोलन केलं आहे. मात्र या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने इंधनदरवाढीविरोधातही आंदोलन करावं असा टोला खडसेंनी लगावला आहे. राज्य सरकारविरोधात वीजेच्या मागणीसाठी आंदोलन करायचं अन् इंधनदरवाढीविरोधात ब्र सुद्धा काढायचा नाही ही दुटप्पी भूमिका असल्याचा टोला खडसेंनी भाजपाला लगावला आहे.

राज्यामधील आघाडीविरोधात आक्रोश मोर्चा काढलाय. लोडशेडिंगविरोधात भाजपाने आज आक्रोश मोर्चा काढलाय, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असं पत्रकारांनी खडसेंना विचारलं. त्यावर उत्तर देताना, “मला वाटतं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना डिझेल, पेट्रोल महाग झालंय. घरचा गॅस महाग झालाय. औद्योगिक गॅस महाग झालाय. विमानभाडं महाग झालंय. रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. लोखंडाचे दर वाढले, सिमेंटचे दर वाढलेत. दिवसोंदिवस सर्वत्र जी महागाई वाढतेय. याच्याविरोधात त्यांनी आक्रोश आंदोलन केलं असतं तर बरं वाटलं असतं,” असा टोला लगावला आहे.

एकीकडे राज्य सरकारविरोधात लोडशेडिंगसाठी आंदोलन करायचं आणि दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेत तर त्याबद्दल ब्र सुद्धा काढायचा नाही. हा दुटप्पीपणा आहे, वीजेची टंचाई आहे हे मान्य करुन चालावं लागले. ही टंचाई आजची आहे असं नाही. दरवर्षी ही उन्हाळ्यात ही आपल्याला जाणवते. यावर मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतंय, असं खडसेंनी म्हटलं आहे.

“भाजपाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचा मी सदस्य होतो. मोफत वीज आणि मुबलक वीज असं २०१४ साली आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासन दिलेलं. मोफत वीज देता आली नाही, मुबलक वीजही देता आली नाही,” असं खडसे म्हणाले.

Sumitra nalawade: