भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ 2 नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली : (BJP star campaigners for Madhya Pradesh Elections 2023) मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपने नुकतेच मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात ४० नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची नावेही या यादीमध्ये आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशातील स्टार प्रचारक आहेत. भाजपने जाहीर केलेल्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे प्रमुख प्रचारक असणार आहेत. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर यांच्यासह चाळीस स्टार प्रचारक भाजपकडून निवडण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात १७ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागेल.

Prakash Harale: