‘भाजपाला २०१७ मध्ये राष्ट्रवादीसोबत युती करावी असं वाटलं होतं, पण…’; आशिष शेलार यांचा खुलासा

मुंबई : नुकताच भाजपा नेते आशिष शेलार यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी २०१७ साली घडलेल्या घडामोडींविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या कार्यक्रमात शिवसेनेसोबतच्या तुटलेल्या युतीसंदर्भात विचारणा केली असता यावर आशिष शेलार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी देखील झाल्याचं ते म्हणाले आहेत.

“ भाजपाला २०१७मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागलं होतं, असं आशिष शेलार म्हणाले. २०१७चा काळ होता. जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती करावी असं वाटू लागलं. शिवसेनेचं रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असं सरकार करावं, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं ठरवलं की आपण तीन पक्षांचं सरकार करू”, असं आशीष शेलार यांनी सांगितलं आहे.

पुढे आशिष शेलार म्हणाले, “आम्ही तेव्हा म्हटलं तीन पक्षांचं अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असं सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीनं याला नकार दिला. आमचं शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपानं शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण २०१९ला सत्ता दिसल्यावर मात्र शिवसेनेनं भाजपाला सोडायची भूमिका सहज घेतली”.

Sumitra nalawade: