“एकनाथ शिंदेंना बदलून अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा भाजपचा डाव”, वडेट्टीवारांचं खळबळजनक वक्तव्य

गडचिरोली | Vijay Wadettiwar – गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) बदलून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा डाव भाजपचा आहे, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. ते गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बरी नसल्याचं सांगण्यात येतंय. पण याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून खंडन करण्यात आलं होतं. तर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचं सांगण्यात आलंय.

एकनाथ शिंदेंना आजारी करून अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हा भाजपचाच डाव आहे. तसंच काल अजित पवार यांनी शरद पवारांनी भेट घेतली. त्यांच्यात झालेली भेट ही याच पार्श्वभूमीवर झाली होती, असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.

Sumitra nalawade: