नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७२वा वाढदिवस असल्याने सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा येत आहेत. देशभरात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींत प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने पंतप्रधानांना दिलेल्या शुभेच्छांची सर्वत्र चर्चा आहे.
कंगना रानौतने पंतप्रधानांच्या कार्याची प्रशंशा करत एका चहा विक्रेत्यापासुन जगातील सर्वात शक्तिशाली नेता घडण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास अत्यंत अतुलनीय असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान श्री राम, श्री कृष्ण आणि महात्मा गांधी यांच्या पंक्तीत ठेवत यांप्रमाणेच आपणही अमर राहाल, आपला वसा कोणीही पुसू शकणार नाही. असंही म्हटलं आहे. कंगनाच्या या शुभेच्छांची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘एका चहा विक्रेत्यापासुन जगातील सर्वात शक्तिशाली नेता घडण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत अतुलनीय आहे. भगवान श्री राम, श्री कृष्ण आणि महात्मा गांधी या यांप्रमाणेच आपणही अमर राहाल. आपला वसा कोणीही पुसू शकणार नाही. ‘आपण कायम देशवासीयांच्या मनात राहाल. त्यामुळेच आम्ही आपल्याला अवतार मानतो. आपण आम्हाला नेते म्हणून लाभल्याबद्दल आपले आभार’ अशाप्रकारची पोस्ट इंग्रजीतून कंगना रानौतने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला ठेवली आहे.