मुंबई | एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त श्रीदेवी यांच्या नावाची चर्चा होती. श्रीदेवी यांच्या निधनाला आता पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनातून कमी होत नाहीत. त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. तर आता त्यांचं आयुष्य पुस्तकातून उलगडणार आहे. 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांच्या निधनाला पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी – द लाइफ ऑफ अ लीजेंड’ या बायोग्राफीची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यांचे पती बोनी कपूर यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करत असताना या पुस्तकाचं काम कुठपर्यंत आलंय हेही त्यांनी सांगितलं.
श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित या बायोग्राफीबद्दल बोनी कपूर यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, “तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची ताकद होती. जेव्हा जेव्हा ती तिच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावरून भेटायला यायची, तेव्हा तेव्हा ती सर्वात जास्त खुश असायची. ती खूप निडर होती. धीरज कुमार यांना ती आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य मानायची आणि आज ते श्रीदेवीच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहीत आहेत याचा आम्हाला फार आनंद आहे. ते एक संशोधक आणि लेखक आहेत.”