ईशान्य भारतातील युवक मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. काश्मीरमधील लोकांना सामावून घेऊन त्यांना उपकाराच्या भावनेने मदत न करता त्यांचा आपल्या देशावर अधिकार आहे या भावनेने मदत करणार आहोत.
पुणे ः काश्मीरमधील अॅपल टूरिझमच्या यशस्वी प्रयोगानंतर पुण्यातील सामाजिक संस्था सरहद आता जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, तसेच ईशान्य भारतातील युवकांना प्रशिक्षण देऊन ‘बॉर्डर टूरिझम’ सुरू करणार आहे. या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार म्हणाले, हे युवक अनाथ आणि गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना त्यांच्या भागाच्या विकासासाठी काही करायचे आहे. बॉर्डर टूरिझमच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होतील या सर्व उपक्रमात पुण्यातील गणेश मंडळे, शिक्षण संस्था आणि आयटी कंपन्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात ११ गावांची निवड करण्यात आली असून, त्यात पंजाबमधील पाकिस्तान बॉर्डर, तसेच दोडा जिल्ह्यातील लेहोटा, कुपवारा जिल्ह्यातील दर्दपोरा, कारगिल मधील हुंदरमान, बांदीपोरामधील आरागाम, बारामुल्लामधील सोपोर, ईशान्य भारतातील बॉडोलँड (कोक्राझार), उदलगिरी तसेच लेहमधील चीनच्या बॉर्डरवरील गावांचा समावेश आहे. पर्यटकांना सीमेवरील गावांमध्ये नेले जाईल. तेथे त्यांना सीमेवरील नागरिकांचे जीवन व त्यांच्या हालअपेष्टा जवळून अनुभवता येतील. यामुळे भारत-पाकिस्तान- बांगलादेश-चीन सीमेवरील भारतीय सैन्यदलातील अधिकारी व सैनिकांशी पर्यटकांना संवाद साधण्याचीही योजना मदतपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमात स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याची, तसेच नवीन पर्यटनस्थळे निर्माण करण्याची क्षमता आहे. यामुळे सीमावर्ती भागातील स्थानिक लोकांची नाळ उर्वरित भारताशी जोडता येईल. सरहदच्या सहकार्याने बॉर्डर टूरिझम हा उपक्रम १९ जुलै २०२२ पासून सुरू होणार आहे.