पुणे | शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बलात्कार, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, असेही प्रकार समोर येत आहेत. पुण्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसाेबत एका तरुणाने प्रेमसंबंध निर्माण करत, मुलीचे अश्लील फाेटाे आणि व्हिडिओ काढले. सदर फाेटाे व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित तरुणाने मुलीच्या आईवडीलांकडून पाच हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राेशन कैलास चव्हाण (वय-25) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पिडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आराेपीवर बलात्कारासह, पाेक्साे आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी या दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. आरोपीने स्वताच्या मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर आरोपी मुलीच्या आईकडे पैशांची मागणी करू लागला. पैसे नाही दिले तर तुमच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देखील त्याने मुलीच्या आई वडिलांना दिली.
मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनी संबधित आरोपी मुलाला पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले. पैसे घेतल्यानंतर संबधित आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मुलीचे अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनेनेचे गांभीर्य ओळखत संबधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.