शरद पोंक्षे यांचे आवाहन
पुणे : जात संपविण्यासाठी मी पंधरा वर्षे व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा दुराभिमान नाही. जात संपली पाहिजे; मनुष्य हा धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे, म्हणून त्यासाठी प्रयत्न करायलाच नको, असे म्हणून चालणार नाही,’ याकडे पोंक्षे यांनी लक्ष वेधले. जात संपविण्याच्या कामात कधीतरी यश मिळेल. आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल, अशीही अपेक्षा व्यक्त करताना सध्या मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास सुरू केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत; तेवढेच आंबेडकरही प्रिय आहेत, असे मत शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिक आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ मासिकाच्या वतीने यंदाचा ‘ब्राह्मणभूषण पुरस्कार’ पोंक्षे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
‘इंदुमती-वसंत करिअरभूषण पुरस्कार’ दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात आला. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी, पोंक्षे, लांजेकर, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे उपस्थित होते. शरद पोंक्षेलिखित ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे या वेळी लोकार्पण करण्यात आले.
जातीयवाद्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले आहे. ते सुधारण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा आहे, असा दावा पोंक्षे यांनी केला असून जाती संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे,’ असे आवाहनदेखील शरद पोंक्षे यांनी केले.