मुंबई | Brijbhushan Singh – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्येत येण्यापासून रोखणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. बृजभूषण सिंह 15 डिसेंबरला महाराष्ट्रात येणार असून मनसेकडून त्यांना कोणातही विरोध होणार नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यावर बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. राज ठाकरे विरोध करत नाहीत ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.
“माझा राज ठाकरेंना तात्विक विरोध होता. मी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली होती की संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य करण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
“आम्ही तर कुस्तीमधील आहोत. संपूर्ण देशभर आम्ही प्रवास करत असतो. महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानानं आपण भेदभाव करत असल्याचं सांगावं. आम्ही त्यांना प्रेम देतो, सन्मान करतो, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करतो,” असंही बृजभूषण सिंह म्हणाले.
दरम्यान, 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. यानंतर बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता.